कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम देता येत नसेल तर उर्वरित २० टक्के रक्कमेची साखर शेतकऱ्यांना देऊ करा, असा तोडगा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखानदार यांना सुचवलाय. या तोडग्याला राज्यातील अनेक साखर कारखानदारांनी सहमती दर्शवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून त्यांना एफआरपीच्या रक्कमेची साखर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांना साखर नको आहे, त्यांना मात्र साखर कारखानदार यांच्याकडे पैसे उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
बाजारपेठेत साखरेचे भाव कोलमडल्यामुळे देशातील साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत सापडली आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांचे शिष्टमंडळ साखर आयुक्त यांना भेटले. त्यानंतर हा तोडगा निघाला आहे. पण या तोडग्याला ऊस उत्पादक शेतकरी कसा प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.