हेमंत चापुडे, झी मिडिया, जुन्नर : लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली आहे. कधी वादांमुळे तर कधी तिच्या अदांमुळे सोशल मीडियावर (Social Media) ती नेहमीच चर्चेत असते. सबसे कातिल गौतमी पाटील हे वाक्य तर आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील पोरा-टोरांनाही पाठ झालं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की तुफान गर्दी झालीच पाहिजे. लोकं अगदी घराच्या शेडवर, झाडाच्या फांद्यांवरुन चढून कार्यक्रमाला गर्दी करताना दिसताय. आता गावागावात आपलं स्टेट्स वाढवण्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. डीजेच्या कर्णकर्कश आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसतेय.
लावणीतून अश्लिलता पसरवल्याचा आरोप
गौतमी पाटीलच्या लावणीला (Lavani) गर्दी होत असली तरी लावणीतून अश्लिलता (Obscene) पसरवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. लावणीच्या नावाखाली कार्यक्रमात अश्लिल हावभाव करणं, तोकडे कपडे घालणं, केस मोकळे सोडणं असले प्रकार गौतमी पाटील करत असल्याची टीका तिच्यावर केली जातेय. त्यामुळे लावणीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोणही बदलत चाललायं. गौतमीच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरुन तिच्या अंगप्रदर्शनावरुन लावणी कलावंत मेघा घाडगे आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेककर यांनी जोरदार टीका केली होती.
लावणी म्हणजे काय?
नृत्य, संगीत आणि अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'. लावणीमध्ये ढोलकी आणि तुणतुणे या वाद्याचा साथीने सादर केली जाते. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठेच योगदान आहे. लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. ढोलकीवर थाप, घुंगरांची साथ आहे. मार्मिक विनोदाने प्रेक्षकाने हसवण्याची ताकद आहे.
गौतमी पाटीलमुळे लावणीला फटका
गौतमी पाटील महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली असली तरी तिच्या कार्यक्रमांमुळे आता महाराष्ट्रातील अस्सल तमाशासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. गौतमी पाटील ज्या पद्धतीने लावणी सादर करते तशाच लावणीची मागणी आता प्रेक्षकांकडून होत आहे. लोकांना ढोलकीची थाप नको तर डीजेच्या तालावर नाचायचं आहे. पण यामुळे तमाशाची कला लोप पावेल अशी भीती तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली आहे.
गौतमी पाटील ज्या प्रकारे कार्यक्रम करते, तो प्रकार चांगला नाही. गावकऱ्यांनी स्टेज बांधायचा, गावकऱ्यांनीच डीजे आणायचा, गावकऱ्यांनी लाईटिंग लावायची. गौतमी पाटील चार मुली घेऊन येते आणि डीजेवर नाचते. डीजेच्या तालावर पोरंही नाचतात. आता तोच प्रकार तमाशात व्हावी अशी अपेक्षा प्रेक्षक करु लागले आहेत. लोकं म्हणतायत, गणगवळण नको, तुमचे विनो नको, फक्त डीजेवर गाणी लावा. पण तमाशा असा चालणार नाही. तमाशाची कला लोप पावेल अशी खंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केलीय. तमाशा तमाशा सारखाच चालु द्या, तमाशाचा गौतमी पाटील होऊ देऊ नका, अशी विनंतही खेडकर यांनी व्यक्त केलीय.