दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्या; चंद्रकांतदादानी पुन्हा केली मागणी

निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत.   

Updated: Jan 14, 2022, 06:36 PM IST
दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्या; चंद्रकांतदादानी पुन्हा केली मागणी

कोल्हापूर : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून प्रश्नचिन्ह उभे करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा 
तब्येत बरी नसेल तर दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्या अशी आग्रही मागणी केली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत.  

संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण, तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, असे ते म्हणाले. 

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे असा सवाल केला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे काल पंतप्रधान यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री यांनी दांडी मारली. पण, तेच मुख्यमंत्री आज महापालिकेच्या बैठकीला उपस्थित होतात? ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे असा सवाल त्यांनी केला आहे.