Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं. पण अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं आणि चांदी महागलं आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोने-चांदीच्या दरात जळगावच्या सुवर्ण नगरीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोनं आणि चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
काही दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात प्रतिकिलो 1100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता चांदीचा दर प्रतिकिलो 82 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. तर सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोनं आता प्रतितोळा 72 हजार 300 रुपयांवर पोहोचलं आहे.
धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे. यादिवशी जर एखादं शुभ काम करायचं असेल तर त्यासाठी मुहूर्ताची गरज नाही. यादिवशी सोने-चांदी खरेदीपासून लग्न, शुभ कार्य. गृहप्रवेश आणि मुंडन, कार किंवा घर खरेदी करण्यात येते.
हा दिवश खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू होतं अशी मान्यता आहे. पण यादिवशी सोनं खरेदी का केलं जातं? हे समजून घ्या
अक्षय्य तृतीयेबद्दल अशी मान्यता आहे की, यादिवशी केलेल्या शुभ कार्याला चौपट फळ म्हणजे अक्षय प्राप्त होतं आणि त्या वस्तूची कधीही कमतरता पडत नाही. हिंदू धर्मात सोनं आणि दागिने हे लक्ष्मीचं भौतिक रुप मानलं गेलं आहे. त्यामुळे लक्ष्मीची आपल्या आणि आपल्या घरावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणून यादिवशी सोनं खरेदीला महत्त्व आहे. एका पौराणिक आख्यायिकेच्या मान्यतेनुसार या दिवशी घेतलेलं सोनं परिधान केल्यास अकाली मृत्यू टळतो.
दुसऱ्या एका कथेनुसार या दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचं संरक्षण बनवण्यात आलं होतं. त्यामुळे अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी करुन कुबेराची पूजा करण्यात येते. यामुळे घरात कायम सुख समृद्धी नांदेत, असा विश्वास आहे.
पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी शुक्रवार 10 मे 2024 पहाटे 4.17 वाजेपासून शनिवारी 11 मे 2024 पहाटे 02:50 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार शुक्रवार 10 मे 2024 अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे.
सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त - रात्री 12:18 पासून दुपारी 01:59 वाजेपर्यंत
रात्री शुभ मुहूर्त - 09:40 वाजेपासून 10:59 वाजेपर्यंत