आईला संपवल्यानंतर सोफ्यावर बसला अन्... चारित्र्याच्या संशयावरुन मुलाचे भयंकर कृत्य

Gondia Crime : सुरुवातीला या प्रकरणात आई आणि मुलावर कोणी अज्ञातांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक सत्य उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 8, 2023, 04:43 PM IST
आईला संपवल्यानंतर सोफ्यावर बसला अन्... चारित्र्याच्या संशयावरुन मुलाचे भयंकर कृत्य title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदिया (Gondia Crime) शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गोंदिया शहरातील श्रीनगर परिसरामध्ये बुधवारी रात्री एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा 24 तासांमध्ये गोंदिया शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात चक्क मुलानेच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी (Gondia Police) आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात मुलगाही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतक महिला ही मुलगा करण कोरे (24) याच्या सोबत गोंदिया शहरातील श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डात भाड्याच्या खोलीत राहत होती. मृत महिलेचे रायपूर येथे लग्न झाले होते. तिच्या पतीचे 20 वर्षापूर्वीच मृत्यू झाल्याने मृत महिला माहेरी येऊन गोंदिया येथे भाड्याने घर घेऊन राहू लागली. मृत महिलेचा मुलगा करण कोरे हा नागपूरला एमआरशिप करत होता. तो अधून मधून गोंदियाला यायचा. पण जानेवारी 2023 पासून तो गोंदियातच आईसोबत राहत होता. 

अशातच गुरुवारी पहाटे करणने स्वयंपाक घरातील चाकूने आईवर वार करत तिची हत्या केली. रागाच्या भरात करणने आईच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. चारित्र्याच्या संशयातून मुलाने ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आईने स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचा चावा देखील घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलावर उपचार करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अंत्यसंस्कारानंतर मुलानेच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

दुसरीकडे, मृत महिलेचा काळ्या जादूवर विश्वास होता असा संशय मुलाला होता. तसेच त्याला आईच्या चारित्र्यावरही संशय होता. या संशयावरुनच आरोपी करणने आईची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरात पाहिले असता करणची आई रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाक घरात पडली होती. तर आरोपी करण हा सोफ्यावर जखमी अवस्थेत बसला होता. पोलिसांनी करणला दवाखान्यात नेत त्याच्यावर उपचार केले. रात्री अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता आपण आईची हत्या केल्याची कबुली मुलगा करणने दिली आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"आरोपी मुलगा हा गेल्या काही महिन्यांपासून काम सोडून आईकडे गोंदिया येथे राहत होता. बुधवारी रात्री तीन ते चारच्या दरम्यान पोलीस ठाण्याला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोहोचलं. त्याठिकाणी संध्या कोरे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात किचनमध्ये आढळून आला. त्यावेळी मुलगासुद्धा घरामध्येच होता. मुलाच्या हातालासुद्धा जखम होती. त्यानंतर मुलाला रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मृत महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अंत्यसंस्कारानंतर रात्री उशिरापर्यंत तपास करत या गुन्ह्याची उकल केली," अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल ताजने यांनी दिली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x