शिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा

Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Updated: Dec 21, 2022, 01:56 PM IST
शिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा title=

Ratnagiri Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. (Gram Panchayat Election Result) शिंदे गटाने ही निवडणूक लढवली तर ठाकरे गटाने बाजी मारली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.  शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Ratnagiri Gram Panchayat Election Result)

 कांचन नागवेकर यांचा 300 मतांनी पराभव 

 रत्नागिरी तालुक्यातील टेंभे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या कांचन नागवेकर यांचा पराभव झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या त्या रत्नागिरी महिला तालुकाप्रमुख होत्या. गेली दहा वर्ष टेंभे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी कांचन नागवेकर होत्या. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेना महिला तालुकाप्रमुख या पदाचा त्यांनी राजीनामा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे कालच दिला.

 दरम्यान, कांचन नागवेकर यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्ट केले की, मी टेंभे गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते.  पण या निवडणुकीत मी 300 मतांनी पराभूत झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा जिल्हाप्रमुख यांच्याकडे सादर केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. 100 हून अधिक ग्रामपंचायतीवर मशाल फडकली आहे. जिल्ह्यात  ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत याआधी भाजप - शिवसेना युती असल्याने भाजपने त्याकडे फारसे गंभीरपणे पाहिले नव्हते. यावेळी मात्र भाजपने जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे बऱ्यापैकी भाजपचे सदस्य विजयी झाले आहेत. मात्र, झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात ठाकरे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली आहे.

दापोली तालुक्यात आमदार योगेश कदम यांनी बाजी मारली असून 30 पैकी 24 ग्राम पंचायती शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आणल्या आहेत. तर चिपळूण तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेकडे एकही ग्रामपंचायत गेलेली नाही. तर गुहागर मध्ये आमदार भास्कर जाधव यांनी  21 पैकी 15 ग्राम पंचायतीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. रत्नागिरी तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदार संघात केवळ  एका फरकाने शिंदे गटाची शिवसेना पुढे आहे.  तर आमदार राजन साळवी यांच्या मतदार संघात लांजा राजापूर मध्ये 50 पैकी 30 ग्राम पंचायती वर उद्धव  ठाकरे गटाच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे.