मुंबई : देशात सध्या सर्वच गोष्टींवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींची प्रतिक्षा सर्वच स्तरांतील लोकांना करावी लागत आहे. दरम्यान ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. तर यासाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. एप्रिल ते जून २०२० रोजी मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होतं. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला.
पण कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत होती. त्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. अखेर ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.