दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ग्रामपंचाय निवडणूक गावगाड्याच्या कारभारासाठी अत्यंत महत्वाची असते. ही निवडणूक १६ जानेवारी रोजी पार पडली. याचा निकाल १८ जानेवारी रोजी सोमवारी पार पडला. या निकालातून सत्ताधारी महाविकास आघाडीचं वर्चस्व सगळीकडे दिसून आलं. या निकालात युवक काँग्रेसने बाजी मारल्याचा दावा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्ष विविध दावे करत असताना प्रदेश युवक काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत युवक काँग्रेसचे ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी निवडून आले असल्याचा दावा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे. आमचे जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांच्यावरच आम्ही दावा करत असल्याने तो महत्त्वाचा आहे, असं तांबे यांनी स्पष्ट केलंय. रियालिटी चेक केली तर भाजप राज्यात चार नंबरचा पक्ष असल्याचा दावाही तांबे यांनी केला आहे.
राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत दिग्गजांना धक्का बसल्याचं लागल्याचं चित्रं दिसून आलं. कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का बसला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती.
मात्र चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं वर्चस्व राखलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेनं आपला वरचष्मा कायम ठेवलाय. अनेक ठिकाणी सत्तांतर होताना दिसत असून, अनेक मातब्बर नेत्यांना ग्रामपंचायतीही राखता आल्या नसल्याचं चित्रं आहे.