नागपूरच्या धावत्या मेट्रोमध्ये रंगला हळदीकुंकू समारंभ

नागपूर मेट्रोमध्ये रंगला पारंपरिक कार्यक्रम

Updated: Jan 24, 2021, 08:34 PM IST
नागपूरच्या धावत्या मेट्रोमध्ये रंगला हळदीकुंकू समारंभ

अमर काणे, नागपूर : नागपूर मेट्रोमध्ये अश्लील डान्स आणि जुगार अड्डा सुरू असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं नागपूरकरांमध्ये संतापाचं वातावरण होतं. मात्र त्याच नागपूर मेट्रोमध्ये आज चक्क एक पारंपरिक कार्यक्रम रंगला. संक्रांतीच्या निमित्तानं सध्या सगळीकडेच हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पण हा हळदीकुंकू एकदम खास आहे. कारण नागपूर मेट्रोच्या डब्यात शनिवारी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ रंगला.

पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून आलेल्या जिल्हा परिषद शिक्षिकांनी धावत्या मेट्रोमध्येच हळदीकुंकू साजरा केला.. एकमेकींना वाण देत आनंदाची उधळण केली. या महिला आपल्या मुलाबाळांना देखील सोबत घेऊन आल्या होत्या. मेट्रो राईडचा आनंद घेत एकमेकींशी भरपूर गप्पाही मारल्या. 

संबंधित बातमीनागपूर मेट्रो की डान्स बार, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

अलिकडेच नागपूर मेट्रोमध्ये एका स्थानिक राजकीय नेत्यानं आपल्या सहकाऱ्यांसह बर्थडे साजरा केला. त्यावेळी तृतीयपंथीयांसोबत अश्लील डान्स करण्यात आले. याच मेट्रोच्या डब्यात जुगार अड्डाही रंगला होता. त्यामुळं नागपूर मेट्रोच्या इभ्रतीला गालबोट लागलं. मात्र महिलांनी पारंपरिक पद्धतीनं हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून शिस्त आणि परंपरेचा आगळा आदर्श घालून दिला.