मुंबई: राज्यातील आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आरोग्य विभागाच्या शनिवारी (उद्या) होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ऐनवेळी आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचाही मोठा गोंधळ उडाला आहे. आरोग्य क आणि ड विभागासाठी घेण्यात येणाऱ्या उद्याच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. क आणि ड आरोग्य विभागाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार य़ाबाबत सध्या कोणतीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही. फक्त आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या सावळ्यागोंधळामुळं परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या क गटातील 2739 आणि ड गटातील 3466 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची लेखी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबरला घेण्यात येणार होती. राज्यातील 1500 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र ही परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.