मुंबई : नाशिकमध्ये पाऊस अजूनही सुरूच आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून 9000 कुसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. एकूण बारा हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीत पूरपरिस्थिती निर्माण झालीय. नांदूर मध्यमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक्स वेगाने गोदावरीत प्रवाहित करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी तीरावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
नाशिकमध्ये संततधार पावसानं गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाढत्या पावसामुळे दुतोंड्या मारुती बुडाला आहे. पुण्यातला बाबा भिडे पूल पाण्यात, तर कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोलीत पावसामुळे भामरागड-आलापल्ली मार्ग आजही बंद ठेवण्यात आलाय. पर्लकोटा आणि बांडीया नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने सोमवारपासून इथली संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे जवळपास 200 गावांचा संपर्क तुटलाय.
कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असून पाणी पातळी 42(बेचाळीस) फुटावर जाऊन पोहोचली आहे. पंचगंगा नदीची धोकापातळी 43 (त्रेचाळीस)फूट असून जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत. पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्गावर पाणी आलं असून, कोकणाला जोडणारे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-राजापूर आणि कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.