धुळ्यात पूरस्थिती : मेडिकल कॉलेजचा संपर्क तुटला, रुग्ण-डॉक्टरांचे हाल

धुळे शहर आणि तालुक्यासह साक्री तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने एकच गोंधळ झाला.  

Updated: Jul 4, 2020, 03:55 PM IST
धुळ्यात पूरस्थिती : मेडिकल कॉलेजचा संपर्क तुटला, रुग्ण-डॉक्टरांचे हाल title=
छाया - प्रशांत परदेशी, धुळे

प्रशांत परदेशी / धुळे :  शहर आणि तालुक्यासह साक्री तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने एकच गोंधळ झाला. धुळे शहरालगत असलेल्या नॉन कोविड रुग्णालय असलेल्या एसीपीएम कॉलेजचा संपर्क काही काळ तुटला होता. त्यामुळे रुग्णांचे हाल झालेत. काही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. या ठिकाणी हरणमाळ आणि चितोड परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नकाणे तलाव हा ओसंडून वाहू लागला. सांडव्याचे पाणी हे रस्त्यावरून वाहू लागल्याने रुग्णालयात संपर्क तुटला. 

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी अडकलेत

साक्री रोड ते हरण्यामाळला जाणाऱ्या रस्त्यावर तलावाच्या सांडव्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहू लागला. त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचाही संपर्क तुटला. याठिकाणी येणारे रूग्ण, गर्भवती महिला यांचे प्रचंड हाल झाले. डॉक्टर्स तसेच कॉलेजचे व हॉस्पिटलचे कर्मचारी पोहोचू न शकल्याने अनेक शस्त्रक्रिया रदद कराव्या लागल्या.

तलावातील पाणी रस्त्यावर आले. पाण्याचा एक मोठा प्रवाह जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या भिंतीला लागून रस्त्यावर आला. कॉलेजच्या कोप-यावरील रस्ता आधीच पावसाने खचल्याने अक्षरक्ष: याठिकाणी पाण्यामुळे धबधबा तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रात्रीपासून अनेक वाहने, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, १०८ रूग्ण्वाहिका, रूग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये अडकून पडले. तर दुसरीकडे शनिवारी नेहमीप्रमाणे रूग्णसेवा देण्यासाठी जाणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी अडकून पडल्याने अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया रदद कराव्या लागल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. विजय पाटील यांनी दिली. 

रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया रखडल्या

याशिवाय रूग्णालयाला लागणारे अत्यावश्यक साहित्य जसे ऑक्सिजन सिलिंडर, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्यही रूग्णालयात पोहोचवता आले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांचे व डॉक्टरांचे आतेानात हाल झाले. मागील वर्षीच्या पावसातही याभागात पाणी साचून रस्ता बंद झाला होता. याबाबत निवेदन गतवर्षी देण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. 

 हिरे मेडिकल कॉलेज कोविड रूग्णालय घोषित झाल्यानंतर सामान्यांवर केवळ एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु रस्ताच बंद झाल्यामुळे याठिकाणी रूगणांना पोहोचता आले नाही. अनेक गर्भवती महिला सकाळी अडकून पडल्याचे चित्र होते. तर बाहेरगावाहून येणारे डॉक्टर्स, सर्जन, भूलतज्ञ सारेच रस्ता बंद असल्याने अडकून पडल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, तहसीलदार, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामणी आदींनी या भागाची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाला नेमकी अडचण लक्षात आणून देण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आमदार कुणाल पाटील यांच्यासह हॉस्पिटल प्रशासनाने केली.  

रस्त्यामुळे जीव धोक्यात

नकाणे तलाव सांडव्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह या रस्त्यावरून जात असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. डॉक्टर्स तसेच आरेाग्य कर्मचारी यांना वापरण्यासाठी केवळ हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्यास आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.