मुंबई : Heavy rain in konkan :कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील २३ गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटद्वारे दिली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआर एफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही यलो अलर्ट देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे.
दक्षिण कोकण आणि गोवा भागात सकाळपासून पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. कोकणात पुढील काही तास मध्यम ते तीव्र सरींची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत.
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली होती । आता पूर ओसरत आहे. त्यामुळे पुराचा मोठा धोका टळला आहे.#Rain #Raigad #Mahad #Rains #HeavyRainfall #Maharashtra #MonsoonNews #Konkan pic.twitter.com/bsSd24Us2L
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 5, 2022
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरुन वाहात आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं, तसंच जीवितहानी होऊ न देणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचे निर्देश दिलेत.
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तालुक्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. पहाटेपासून गुहागर मधील बहुतांश भागात पावसानं तुफान बॅटिंग सुरू केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहतायत. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास गुहागरमधील अनेक भागात नदीचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झालीय. समुद्राला मोठ्या प्रमाणात आलेल्या उधाणामुळे किनारपट्टीवर मोठी धूप झाल्याचं पाहायला मिळत आहे.