रत्नागिरीत मुसळधार, मुंबई-गोवा महामार्ग बंद

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद 

Updated: Jul 15, 2019, 12:37 PM IST

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीतील संगमेश्वर, चिपळूणात तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. सह्याद्री खोऱ्यातील 32 गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क तुटल्याचे समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून तिथली वाहतूक वळविण्यात आली आहे.  

या मुसळधार पावसामुळे चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी आले आहे. चिंचघरी येथे रस्त्यावर पाणी आल्याने सती अडरे अनारी रस्ता बंद आहे. तसेच कान्हे पुलावरुन देखील पाणी जात आहे. चिपळूण-गुहागर बायपास मार्गावर देखील पाणी साचले आहे. दरम्यान वाशिष्ठी पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे सकाळी 9:30 वाजल्यापासून या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. खेड दापोली रोडवर नारंगीचे पाणी आल्याने दापोलीची वाहतूकही बंद आहे. तर पालगड पुलावर पाणी आल्याने दापोली-मंडणगड वाहतूक ठप्प आहे.