मान्सून अपडेट : काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती तर जिल्ह्यांमध्ये दिलासा

जाणून घ्या राज्यातील पावसाचा आढाला  

Updated: Jun 18, 2021, 11:13 AM IST
मान्सून अपडेट : काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती तर जिल्ह्यांमध्ये दिलासा

मुंबई :  गेल्याकाही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाने नमतं घेतलं आहे तर काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे . जिल्ह्यातील धरण क्षेत्रात देखील दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला आहे . कोयना धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होते आहे . पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आहे . 

वाशिम जिल्ह्यातील मनोरा, मंगरुळपीर ,मालेगाव रिसोडसह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह रात्री जोरदार पाऊसाच्या सरी कोसळल्या तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्याने बळीराजा आनंदी आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

चिपळूण - कोकणात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला असला तरी गुरूवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण ,दापोली गुहागर तालुक्यातील सखल भागात पाणी साचले आहे. तर ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाशिष्ठी नदी आणि शिव नदी धोक्याची पातळी ओलांडून शहराला पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते.

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे ठिकाण तुम्हा सर्वांना ठावूक आहे. भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ आपल्याला या ठिकाणी पाहायाला मिळतो. सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहण्याचाअनुभव तर काय वर्णावा. मार्लेश्वर येथील हेच फेसाळणारे धबधबे आणि त्यांचं मनाला मोहून टाकणारं विहंगम दृश्य...

वसई विरारला गेल्या 30 तासांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांना पाण्यातून आपल्या कामाची वाट काढावी लागत आहे. विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसर , एम बी इस्टेट परिसर नालासोपाऱ्यातील तुळींज आचोळे रस्ता अद्याप पाण्याखालीच आहे. दरवर्षी होणाऱ्या भरावामुळे वसईकर आता त्रस्त झाले आहेत. 

पिंपरी चिंचवड शहरात सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. गुरूवारी शहरात दिवसभर ठराविक अंतराने पावसाने हजेरी लावली होती. आज देखील सकाळ पासून पावसानी रिमझीम सुरूचं आहे.