सावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी

राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.

& Updated: Jul 7, 2018, 11:43 AM IST
सावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी title=
संग्रहित छायाचित्र

महाड: पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेमुळे काही वर्षांपासून चर्चेत आलेल्या महाडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पाण्याने धोक्याची पातळी उलांडली असून, महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महाड शहराला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, धोक्याचा इशारा ध्यानात घेऊन शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यात मोसमी पावसाचा जोर

राज्यात मोसमी पावसाने जोर धरला आहे. त्यात दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे पाऊस जोरावर आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महाडमधील भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातही दमदार पाऊस

हवामान खात्याने दिलेला इशाऱ्यानुसार कोकणात १० जुलै तर, विदर्भात ८ जुलै पर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, घाटमाथा आणि विदर्भात दमदार पाऊस पडत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.