मालेगावच्या उर्दूघरला हिजाब गर्ल मुस्कानचं नाव, काय होती शिवसेनेची भूमिका?

सतेच्या जोरावर महासभेत ठराव मंजूर, जनता दल आणि भाजपचा विरोध तर शिवसेना...  

Updated: Feb 17, 2022, 06:25 PM IST
मालेगावच्या उर्दूघरला हिजाब गर्ल मुस्कानचं नाव, काय होती शिवसेनेची भूमिका? title=

मालेगाव : मालेगावमधल्या उर्दू घर इमारतीला बहूचर्चित हिजाब गर्ल मुस्कान खान हिचं नाव देण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या उर्दू घर इमारतीला मुस्कानचं नाव देण्याचा ठराव मालेगाव महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या संभेत मंजूर करण्यात आला.

पण या ठरावाला भाजप आणि जनता दलाच्या सदस्यांनी जोरदार विरोध करत ऑनलाईन सभेत गोंधळ घातला. तर शिवसेनेनं ठरावाच्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. अखेर बहुमताच्या जोरावर महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. मुस्कान खान हिच्या शौर्याला सलाम करण्यासाठी शहरात आठ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत उर्दू घराला तिचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे तेढ निर्माण करणारी नावे सरकारी इमारतींना देऊ नये, असे सरकारचे आदेश असतानाही हिजाब गर्लचं नाव उर्दू घराला देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महापौरांचं स्पष्टीकरण
मालेगाव महापालिकेच्या महापौर ताहेरा शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. भारत हा गंगा जमुना संस्कृतीचा देश आहे. या देशात सर्वधर्मीयांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याला गालबोट लावण्याच प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकात हिजाब बंदीविरोधात हजारो महिला रस्त्यावर उतरुन लढा दिला जात आहे. त्यांना धैर्य देण्याचं काम मुस्कानने केलं आहे. तिच्या धाडसाचं कौतुक आणि इतर महिलांना हिंमत देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं ताहेरा शेख यांनी म्हटलं आहे. यामागे कोणतंही जातीय राजकारण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोण आहे हिजाब गर्ल मुस्कान खान
कर्नाटकातील उडुपी इथं एका कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेल्या एका विद्यार्थिनीला जमावाने घेरत जय श्रीरामचे नारे दिले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मुलीनेही दोन्ही हात उंचावून 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या होत्या. या मुलीचं नाव मुस्कान खान. मुस्कानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.