संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला निघालेल्या भाविकांना ट्रॅक्टरने चिरडलं; दोघांचा मृत्यू

Hingoli Accident : हिंगोलीत एका भीषण अपघातात दोन गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

Updated: Nov 2, 2023, 01:37 PM IST
संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला निघालेल्या भाविकांना ट्रॅक्टरने चिरडलं; दोघांचा मृत्यू title=

Hingoli Accident : संकष्टी चतुर्थीनिमित्त (sankashti chaturthi) गणपतीच्या दर्शनासाठी पायी जाणं दोघांना चांगलेच महागात पडलं आहे. हिंगोलीत (Hingoli News) चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी जात असताना दोन भाविकांचा रस्ते अपघाता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपतीच्या दर्शनासाठी पायी जात असताना अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन भाविक जखमी झाले आहेत. दोघांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Hingoli Police) घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

आखाडा बाळापुर ते वारंगा या मार्गावर दाती फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. संकष्टी चतुर्थीनिमित्त सत्य गणपतीला पायी दर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांना अज्ञात वाहनाने चिरडले. यात दोन भविकांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. दयानंद निर्मल (35), गजानन काळे (36) अशी मृतांची नावे आहेत.

बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील मरडगा येथील दयानंद निर्मल, गजानन काळे, पांडुरंग काळे, महेश झांबरे, सखाराम शिंदे हे पाच भाविक चतुर्थी निमित्त सत्य गणपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी रात्री भोकर फाटा येथील सत्य गणपतीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. मरडगा येथून रात्री पाचजण आखाडा बाळापूर मार्गे सर्वजण निघाले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर दातीफाटा येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने पाचही भाविकांना जोरदार धडक दिली. यामध्ये दयानंद निर्मल, गजानन काळे या भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे भाविक गाडीच्या धडकेमुळे रस्त्याच्या खाली एका खड्ड्यात फेकले गेले. भाविकांना उडवल्यानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार प्रभाकर भोंग, मधुकर नांगरे, नागोराव बाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर जखमींना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्रथामिक उपचार देऊन नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाळापुरच्या ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.