सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? ही सांगलीची माहिती.

Updated: Mar 27, 2020, 05:50 PM IST
सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना? title=
संग्रहित छाया

रवींद्र कांबळे/ सांगली : कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? सांगलीतल्या इस्लामपूरसारख्या शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोरोनाचे विषाणू कसे आले ? जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना, सरकार त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना इस्लामपूरसारख्या शहरात २३ जणांपर्यंत कसा पसरतो ?  या प्रश्नांची उत्तरं मिळवताना कोरोना टाळण्यासाठी काय करायला हवं याचीही उत्तरं मिळत जातात. लॉकडाऊनमध्ये घरीच बसून ही साखळी तोडण्यास कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल तक सांगलीत पोहोचलेल्या कोरोनाचा प्रवास सगळ्यांनी वाचायलाच हवा.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे चार जण सौदी अरेबियात धार्मिक यात्रेसाठी हजला गेले होते. १३ मार्चला सर्वजण परतले. विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घरीच राहण्यास सांगण्यात आलं. मुंबईतून कारनं इस्लामपूरला घरी पोहचल्यानंतर त्यांनी कुणालाच भेटणं अपेक्षित नव्हतं. पण दरम्यान ते चौघेही जण कुटुंबीयांच्या संपर्कात आले. पै-पाहुणे त्यांना भेटायला गेले. ते जसे लोकांना भेटले तसा कोरोनाही पसरला. कोरोनाची साखळी कशी असते याचं हे प्रातिनिधिक उदाहरण.

१३ तारखेला सौदी अरेबियातून परतल्यानंतर १४ पासून घरी होते. याच काळात अनेक जण त्यांना भेटायला आले आणि भेटले. १९ मार्चला त्यांना त्रास जाणवू लागला आणि कोरोनाची लक्षणं दिसू लागली. २१ तारखेला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि २२ तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सांगलीत कोरोना पोहचला.

चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मग धावपळ सुरु झाली. त्यांच्या संपर्कात असलेल्या ५ जणांची तपासणी करण्यात आली आणि तीही पॉझिटिव्ह आली. मग या सगळ्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांची तपासणी करण्यात आली. तीदखिल पॉझिटिव्ह आली. ही साखळी मग पुढेच सुरु राहिली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी १२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. पाहता पाहता सहा दिवसांत सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या ४ वरून २३ वर पोहचली.

चौघांना जसजसे लोक भेटत गेले तसा कोरोनाचा फैलाव होत गेला. या चौघांना भेटायला कोल्हापूरच्या वडगावमधून एक नातेवाईक गेली होती. तिचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली.

होम क्वारंटाईनमध्ये असताना या चौघांना कुणीही भेटणं अपेक्षित नव्हतं. पण दिलेली सूचना पाळली नाही आणि कोरोना फैलावला. कोरोना कसा फैलावतो यासाठी ग्राफिक्स आणि डॉक्टरांकडून अनेक उदाहरणं दिली जातात. पण सांगलीचं उदाहरण कोरोनाची साखळी कशी असते आणि निष्काळजीपणा कसा भोवू शकतो हे दाखवून देणारं आहे.