अकोला : अकोला महापालिकेच्या आजच्या सभेतही प्रचंड गोंधळ झालाय. डायसच्या फेकाफेकीसह माईकचीही तोडफोड करण्यात आलीय. यावर कहर करणारा एक प्रकारही आज महापालिका सभागृहात झालाय.
अकोला महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. सर्वसाधारण सभेत स्वच्छता, पंतप्रधान आवास योजनेच्या मुद्द्यावर काँग्रेस, शिवसेनेसह सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. महापालिकेत महापौर विजय अग्रवाल यांना विरोध करणारा एक मोठा गट आहे. आज यातील भाजप नगरसेवक अजय शर्मा आणि विजय इंगळे यांची महापौरांसोबत चांगलीच बाचाबाची झाली.
विशेष म्हणजे भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सभागृहात चक्क डुकराचं पिल्लू आणले. तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी डायसच्या फेकाफेकीसह माईकचीही तोडफोड केलीय. हे नुकसान पठाण यांच्या मानधनातून वसूल करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. महिनाभरापूर्वी झालेल्या २९ मे च्या सर्वसाधारण सभेतही सभागृहात अशीच तोडफोड झाली होती.