धक्कादायक! सासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या

ती आत्महत्या नाही तर हत्याच...

Updated: Mar 13, 2019, 03:53 PM IST
धक्कादायक! सासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या title=

कोल्हापूर : सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सुनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सुनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं. 

सुनेने आत्महत्या केल्याचे भासवून हत्येचा प्रकार लपवण्याचा प्रय़त्न पतीने केला. पोलिसांची दिशाभूल केली. पण आज जुना राजवाडा पोलिसांनी याचा पर्दाफाश केला. पतीने पत्नीला इमारतीवरून ढकलून दिलं आणि डोक्‍यात फरशी घालून तिचा खून केल्याचं पतीने म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपी संदीप लोखंडेला अटक केली असून वडील मधुकर लोखंडे यांनाही ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी संदीप लोखंडेच्या मुलाला शाळेत आल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आईच्या निधनानंतर पत्नीचा हावभाव पाहून संदीपला राग आला. पत्नी कचरा झाडत असताना पतीने तिला इमारतीवरुन खाली ढकलून दिलं. त्यानंतर खाली जावून पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. पण हा गुन्हा तो जास्त काळ लपवू शकला नाही. पोलिसांनी एका दिवसातच या बनावट आत्महत्येचा तपास करुन सत्य समोर आणलं.