जेव्हा मी ह्या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन...
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर...
मला स्मरून कर
हवे तर, मला विस्मरून कर...
पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वेंच्या या ओळी... कदाचित याच ओळींचा ओलावा एका चोराच्या मनात घर करून गेला असावा... नेरळ गंगानगरमधल्या स्वानंद सोसायटीमधल्या सुर्वेंच्या घरात नुकतीच चोरी झाली... आयुष्यभर खस्ता खाल्ल्यानंतर मास्तरांना हे हक्काचं घर मिळालं... चार वर्षं ते या घरात राहिले. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली... मास्तरांच्या निधनानंतर या घरात त्यांची कन्या कल्पना घारे आणि जावई गणेश घारे राहतात... घारे दाम्पत्यानं सुर्वे मास्तरांच्या स्मृती घरात जतन करून ठेवल्यात... दहा दिवसांसाठी घारे दाम्पत्य विरारला मुलाकडे राहायला गेले... आणि त्याचवेळी एका चोरानं डाव साधला... बिच्चारा चोर... त्याची अवस्थाही नारायण सुर्वेंच्या कवितेसारखीच...
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
भाकरीचा चंद्र शोधता शोधता चोरीच्या वाममार्गाला लागलेल्या या बहाद्दरानं चोरलं तरी काय? तर एक टीव्ही... पितळेची समई आणि दिवा... तांब्याची पाच ताटं... पाच लीटर तेलाचा कॅन... स्टीलचे दोन नळ... टेबल फॅन आणि एक किलो तिखट मसाला... अवघा ८ हजार २०० रुपयांचा हा मुद्देमाल... घराच्या खिडकीतून प्रवेश करून सलग दोन-तीन दिवस तो चोऱ्या करत होत्या... त्याचवेळी चोराला भिंतीवर लावलेला नारायण सुर्वेंचा फोटो दिसला.. त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतीचिन्हं, मानपत्रं त्यानं पाहिली. हे घर कविवर्य नारायण सुर्वेंचं आहे, हे लक्षात आल्यावर तो खजिल झाला. त्यानं चोरलेला मुद्देमाल परत केलाच... शिवाय भिंतीवर एक चिठ्ठीही चिकटवून ठेवली...
मला माहित नव्हतं की, नारायण सुर्वे यांचं घर आहे. नाय तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता, परंतु आणून ठेवला.. सॉरी..., असं या प्रामाणिक चोरानं प्रांजळपणे चिठ्ठीत लिहून ठेवलं.
सुर्वे 'मास्तरांच्या विद्यापीठा'त गेलेल्या या चोराला बहुधा 'रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे...' ची आठवण झाली असावी. म्हणूनच त्यानं 'थोडासा गुन्हा करणार आहे' अशी कबुली दिली.. मात्र चोरी शेवटी चोरीच असते... भले ती 8 हजार 200 रुपयांची का असेना... नेरळ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोराचा शोध घ्यायला सुरूवात केलीय... या प्रामाणिक चोराची ही चित्तरकथा पाहिल्यानंतर मास्तरांच्याच ओळी आठवतात.
इतका वाईट नाही मी; जितका तू आज समजतेस
तडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको...