राज्यावर आस्मानी संकट, पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाणे, पुण्यासह 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra weather update: राज्यात मान्सूनपूर्व सरींचे आगामन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 4, 2023, 04:20 PM IST
राज्यावर आस्मानी संकट, पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाणे, पुण्यासह 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा title=
IMD predicts thunderstorm light rainfall in Parts of maharashtra

मुंबईः मान्सूनचे आगमन लांबले असल्याची चर्चा असतानाच आज संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मुंबई विभागाने तसा इशारा दिला आहे. 

IMDच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई उपनगरासह, ठाणे पालघरमध्ये पाऊस होऊ शकते. त्याशिवाय, सातारा, सोलापूर, रायगड, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, बीड, पुणे, हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात पुढील तीन ते चार विजांच्या कडकडाटासह व ताशी ४० ते ५० वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. 

गुजरात राज्यात अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात त्याचा परिणाम जाणवत आहे. तर, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढू शकतो. 

पुणे जिल्ह्याला झोडपले

दरम्यान, पुणे जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्तळीत झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्याच्या या पावसाने मोठ्या प्रमाणात फळबागांसह पिकांचे नुकसान झाले असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. 

घरावरील पत्रे उडून गेली

जालना शहरासह जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन आणि अंबड तालुक्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांत सोसाटयाच्या वाऱ्यामुळे घरावरील आणि गोठ्यावरील पत्रे उडून गेली आहे. तर बदनापूर तालुक्यातील दाभाडी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.तर काही भागात झाडं उन्मळून पडलीत. जालना शहरात आज दुपारच्या सुमारास अचानक सोसाटयाचा वारा सुटला. शहरभर वादळी वाऱ्याचं थैमान बघायला मिळालं. या वाऱ्यामुळे अनेक उभ्या असलेल्या दुचाकी देखील जमिनीवर कोसळून पडल्या. जिल्ह्यातील काही भागात देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ हे वादळी वाऱ्याचं थैमान सुरूच होतं.

शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान 

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ साल्हेर किल्ला परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली असून पावसामुळे सखल भागात पाणी साचले. पावसाने दमदार सुरवात केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.