... तर भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती उरणार नाही- शरद पवार

शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे

Updated: Dec 29, 2019, 05:50 PM IST
... तर भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती उरणार नाही- शरद पवार title=

पनवेल:  रायगड जिल्ह्यात सध्या अनेक कारखाने येत आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. ते रविवारी पनवेलच्या व्ही.के. हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, रायगड जिल्ह्यात अनेकप्रकारचे कारखाने येत असल्यामुळे भविष्यात याठिकाणी शेती शिल्लक राहील की नाही, याबद्दल शंका आहे. अशा परिस्थितीत तरुण पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासोबत गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि व्ही.के. हायस्कुलचे माजी विद्यार्थी मनोहर जोशी हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनीही उपस्थितांना संबोधित केले. मनोहर जोशी यांनी म्हटले की, निवडणुकीतील भाषणापेक्षा शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे. निवडणुकीत निवडून येणं सोप असतं, पण प्रत्येक वर्गात पास होणे, ही कठीण गोष्ट असल्याचे जोशी यांनी म्हटले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही.के. हायस्कुलचे चेअरमन बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकुर, आमदार प्रशांत ठाकुर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षीताई पाटील, विवेक पाटील, जे.एम.म्हात्रे अशा अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश होता.