संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ : पूजा चव्हाण कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती?

पोलिसांच्या हाती लागलेल्या रेकॉर्डिंगमध्ये नक्की काय? 

Updated: Aug 2, 2021, 11:14 AM IST
संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ : पूजा चव्हाण कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती?

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यामुळे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात संवाद झाल्याची ऑडिओ क्लिप तपासादरम्यान पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबच्या हाती लागली आहेत.  

त्यात पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी 4 ते 5 दिवस आधी संजय राठोड आणि पूजामध्ये 90 मिनिटांहून अधिकचा संवाद झाला असल्याचं समोर येत आहे. पूजाने 7 फेब्रुवारीला पुण्यातील इमारतीतून उडी मारत आत्महत्या केली होती.

पुराव्यांच्या आधारे प्रथमदर्शनी, पूजाशी बोलणारी व्यक्ती राठोड असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व संभाषण बंजारा भाषेत झाले असून भाषांतर केले जात आहे. चौकशीचा अंतिम अहवालात काय समोर येतं याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.