'तुमच्यावर असं बेतलं तर...'; शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना अपील!

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक करण्यात आली आहे.  यानंतर त्यांनी विरोधकांना आवाहन केलं आहे.

Updated: Dec 10, 2022, 07:19 PM IST
'तुमच्यावर असं बेतलं तर...'; शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना अपील! title=

पुणे :  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवड येथे आले होते त्यावेळी काहींनी त्यांच्यावर शाईफेक केली. पोलिसांनी संबंधित शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना अपील केलं आहे.  

जर तुमच्यावर बेतलं तर केवढ्यात पडेल तुम्हाला?, असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांनी हे तर म्हणावं की ही घटना चुकीची नाही असंं आवाहन केलं आहे. मी रडणारा नाही लढणारा माणूस आहे. आता बोलावं राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांनी, तुम्ही अशी झुंडशाही चालू देणार आहात का? असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

शाईफेक करणाऱ्यांना अटक
शाईफेक करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रकांत पाटील महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर ही शाईफेक करण्यात आली. यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  तसंच पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत निदर्शनं करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. 

पाटील काय म्हणाले होते?  
"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते.  10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा या वक्तव्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.