Irsalwadi Uddhav Thackeray: इरसालवाडी दुर्घटनाग्रस्थांचे जवळपासच्या गावांमध्ये पुनर्वसन कसे करु शकतो, याची योजना केली पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. इरसालवाडी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरकार कोणतंही आलं तरी योजनेला स्थगिती येता कामा नये. इरसालवाडीच नव्हे तर दरडग्रस्त भागात राहणाऱ्यांना सुरक्षितस्थळी नेण्याची योजना करायला हवी. यात धोकादायक, अतिधोकादायक अशी वर्गवारी करु नये. दरडग्रस्त भागातील कुटुंबाना जवळच्या गावात राहण्याची व्यवस्था करायला हवी
दुर्घटना घडल्यानंतर आपण धावपळ करतो. पण तळीये ग्रामस्थांचे पुनर्वसन झाले आहे का? हेदेखील पाहायला हवे असे ते म्हणाले.
सरकारकडे जाऊन हे प्रश्न मांडणार का? असा प्रश्न त्यांना यावेळी करण्यात आला. त्यावर बोलताना, आज मी सरकारकडे पक्ष म्हणून बघत नाही, जनता म्हणून पाहतो, असे ते म्हणाले.
काय बोलू, कोणत्या भाषेत सांत्वन करु हे मला समजत नव्हते. आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मत मागायला जातो. आता सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र यायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.