मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे. 

Updated: Jan 30, 2020, 06:34 PM IST
मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाच पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवरूखमधील कोसुंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना आयटम सॉगवर डान्स करतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते नाराज झाले. अशा गाण्यांमुळे लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना काय संस्कार मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी तात्काळ हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि तसे जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाला आदेश दिलेत.

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी जिल्हा परिषद शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रमात असे डान्स बघितले आणि तातडीने जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांध्ये आयटम सॉंगवर बंदीच आणली. जिल्ह्यातल्या २५०० शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास ४० हजार विद्यार्थी सध्या शिकत आहेत. तर, सात हजार शिक्षक काम करत आहेत. जो कोणी नियम मोडेल त्याच्यावर सक्त कारवाईचे आदेश रोहन बने यांनी दिले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत, मुलांचा कला गुणांना वाव देखील मिळाला पाहिजे. पण त्यासाठी आयटम साँग हे माध्यम नाही ना, आज जिल्हा परिषद शाळांमध्ये सऱ्हास आयटम साँगवर लहान मुलं नाच करताना दिसतात. हे थांबायला हवे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. जे कोणी नियम मोडणार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे स्पष्ट संकेत जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन  बने यांनी दिलेत.

दोन दिवसांपूर्वी देवरूखमधल्या कोसुंब या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी आयटम साँगवर डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिले आणि हा निर्णय घेतला. शिक्षकांनी बने यांच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. त्यानंतर पालकांनी देखील हा निर्णय योग्य असल्याचं म्हटले आहे. याबाबत शिक्षक समीधा माळवदे म्हणाल्यात हा चांगला आणि योग्य निर्णय आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतलेल्या निर्यणायच शिक्षक म्हणून मी स्वागत करते, चांगला उपक्रम आहे.

 खरंच हा निर्णय योग्य आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो मुलांवर वाईट संस्कार होतात, ते निदान कमी होतील, असे पालक रश्मी सोलकर म्हणाल्यात. या साऱ्यांमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विद्यार्थी शिवतेज धुळप म्हणाला, मी पाहिल्यांदा ओ माय फ्रेंन्डवर डान्स केला होता. मात्र यावर्षी आम्ही पोवाडा आणि कोळीगीतांवर डान्स करणार आहोत.

शाळांमध्ये जरी आयटम साँग बंदी घातली तरी, मंडळे आणि गल्लीबोळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे काय करणार? शिवाय, टीव्ही, समाजमाध्यमांमधून देखील आयटम साँग वाजले जातात. त्याला कसं रोखणार आणि त्यावर उपाय काय असा प्रश्न देखील विचारला जात आहे.