विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलय. मात्र, जळगावात जोरदार चर्चा सुरू आहे ती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या विषयाची... भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा महाजन यांचे उत्साही कार्यकर्ते करत आहेत. इतकंच नाही तर या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी 'महाराष्ट्राचे लोकनेते तसंच भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले फलक शहरभर झळकावलेत.
दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलणाऱ्या डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करताना दिसले होते. त्यांच्या मागण्या व इतर सूचना मान्य करून त्यादृष्टीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालातील भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यादृष्टीने तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ कडे अनेकांनी आपलं लक्ष केंद्रीत केलंय.