खडसेंना पक्ष सोडायचा असता तर.. गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

आक्रोश मोर्चात गिरीश महाजन सहभागी 

Updated: Oct 12, 2020, 06:06 PM IST
खडसेंना पक्ष सोडायचा असता तर.. गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण  title=

जळगाव : भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चांवर जळगावात भाष्य केले. मुंबईतील पक्षाच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली त्यामुळे ते पक्ष सोडून जातील असे आपणास वाटत नाही. पक्ष सोडायचा असता तर ते बैठकीला हजर राहिले नसते. मी छोटा कार्यकर्ता असल्याने मी काही त्यांचं मन वळवू शकत नाही पक्षश्रेष्ठी या बाबत प्रयत्न करतील असे महाजन यावेळी म्हणाले. खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात गिरीश महाजन सहभागी होते. यावेळी ते बोलत होते. 

महिलांवरील अत्याचार थांबविण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत जळगाव भाजपातर्फे सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडीच्या कालखंडात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली अशी टीका गिरीश महाजन यांनी आघाडी सरकारवर केली.

महिलांवर कुठेही अत्याचार होणे ही चांगली बाब नाही या घटना सातत्याने वाढत असल्याने अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही शासनावर दबाव वाढवणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

महिलांच्या संदर्भात अशा घटना कुठेही घडत असतील त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. उत्तर प्रदेशात घटना घडली आता आम्ही निषेधच केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने आणि केंद्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातले असून यासंदर्भात दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई जाईल असे रक्षा खडसे म्हणाल्या. योगी आदित्यनाथ यांच्या आपण राजीनामा मागणार का ? यावर बोलतांना खासदार रक्षा खडसे यांनी योगी सरकारने संबंधित दोषींवर कार्यवाही केली आहे. त्यामुळे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्या म्हणाल्या.