जळगाव : जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाच्या निकालाचं वार्तांकन करण्यासाठी गेलेले 'झी २४ तास'चे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्यासोबत पोलिसांनी अरेरावी करून गैरवर्तणूक केल्याची घटना आज घडली. न्यायालयाचा सन्मान राखून वार्तांकन करत असताना पोलीस प्रशासनातील अधिकारी अरेरावी करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांनी केलाय. तसंच खडसे यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांसोबत अरेरावी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी हे आदेश दिलेत. या मारहाणीचा जिल्ह्यातील सर्वच घटकातून निषेध करण्यात येतोय. सर्व पत्रकार संघटनांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय.
दरम्यान, बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकारांचा निकाल पुन्हा पुढे ढकलला गेला आहे. न्यायमूर्ती सृष्टी नीलकंठ या सुट्टीवर असल्याने या प्रकरणात सुनावणी झाली नाही. न्यायमूर्ती निळकंठ या हजर नसल्याने न्यामूर्ती उगले यांच्या न्यायालयात कामकाज झाले. यावेळी २७ जूनची तारीख देण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख संशयित न्यायालयात हजर होते. या गैरव्यवहारात माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर तसंच प्रदीप रायसोनी, राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी असे सर्वच प्रमुख संशयित आहेत. न्यायालय या बहुचर्चित प्रकरणात काय निकाल देते? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.