Jalgaon News : एका वृद्ध दाम्पत्याचे मृत्यूने जळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगावच्या (Jalgaon) मेहरुन परिसरात पत्नीच्या निधनानंतर पतीनेही प्राण सोडला. पत्नीचा तेराव्याच्या कार्यक्रमानंतर पतीचेही निधन झाले आहे. मात्र वडिलांनी जाता जाता आम्हाला मोलाचा संदेश दिल्याचे मुलांनी सांगितले आहे. पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर पतीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर पतीनेही प्राण सोडला आहे.
जळगाव मेहरूण परिसरातील भवानी नगर येथील वाय. डी. पाटील शाळेसमोर राहणाऱ्या शकुंतलाबाई श्रीराम बोडखे (75) यांचे दोन आठवड्यांपूर्वीच निधन झालं होतं. शकुंतलाबाई यांच्या तेराव्याच्या दिवशी पती श्रीराम भिमराव बोडखे यांनी 78 वर्षीय अखेरचा श्वास घेतला. शकुंतलाबाई यांचे 8 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.
20 जानेवारी रोजी शकुंतलाबाई यांचा तेराव्याचा कार्यक्रम होता. मात्र सकाळपासूनच श्रीराम भिमराव बोडखे यांची तब्येत खराब होती. पत्नीचा विरह सहन न झाल्याने श्रीराम बोडखे यांचे निधन झाले. तेराव्याचा कार्यक्रम संपताच संध्याकाळी श्रीराम बोडखे यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुलांना दिला मोलाचा सल्ला
सर्वांशी चांगले रहा, सचोटीने राहा, असे बाबा सातत्याने सांगत होते असे मुलगा ताराचंद बारी व अनिल बारी यांनी सांगितले. दोघांच्याही निधनाने बोडखे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. श्रीराम बोडखे यांच्या पाठीमागे ताराचंद बारी, अनिल बारी अशी दोन मुले आहेत. तर दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद येथील असलेले बोडखे दाम्पत्य कामानिमित्त काही वर्षांपासून जळगावला स्थायिक झाले होते.