भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारे जुई धरण ओव्हरफ्लो

भोकरदन शहराचा वर्षभराचा पाणीप्रश्न मार्गी लागलाय.

Updated: Jun 30, 2019, 01:17 PM IST
भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारे जुई धरण ओव्हरफ्लो title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील शेतकरी आनंदीत झालेत. सलग 5 दिवसांपासून या भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीनंतर पावसाचा चांगलाच दिलासा मिळालाय. भोकरदन तालुक्यातील पारध, वालसावंगी, रेणुकाई पिंपळगाव, सुरंगळी या भागात मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलाय. भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारं जुई धरण ओव्हरफ्लो झाले आगे. त्यामुळे भोकरदन शहराचा वर्षभराचा पाणीप्रश्न मार्गी लागलाय.

गेल्यावर्षी कमी पावसामुशे हे धरण पूर्णतः कोरडे पडले होते. पण गेल्या 5 दिवसांपासून या भागात पावसाने संततधार असल्याने धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह धरण क्षेत्रांत येणाऱ्या 40 गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तर जाफ्राबाद तालुक्यात देखील रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकरी देखील सुखावला आहे.

मात्र जिल्ह्यातील मंठा, परतूर, अंबड, घनसावंगी, जालना या भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 12.22 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.