Toyota ची महाराष्ट्रात एंट्री! थेट छत्रपती संभाजीनगरात 20 हजार कोटींची गुंतवणूक; 20 हजार हातांना मिळणार रोजगार

Toyota to invest in Maharashtra: जपानच्या टोयोटाने (Toyota) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 31, 2024, 03:17 PM IST
Toyota ची महाराष्ट्रात एंट्री! थेट छत्रपती संभाजीनगरात 20 हजार कोटींची गुंतवणूक; 20 हजार हातांना मिळणार रोजगार title=

Toyota to invest in Maharashtra: जपानच्या टोयोटाने (Toyota) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे 8 हजार कोटींची रोजगार निर्मित होईल. या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या (Marathwada) अर्थकारणाला चालना मिळेल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते. आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) यावेळी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला असून छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीची 20 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राला ऑटोमोबाईल क्षेत्रात एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे 8 हजार प्रत्यक्ष तर 12 हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या ऐतिहासिक करारासाठी मराठवाड्याला खूप-खूप शुभेच्छा अशी कॅप्शन त्यांनी लिहिली आहे. 

दरम्यान एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत ते सांगत आहेत की, "छत्रपती संभाजीनगरसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची 20 हजार कोटींची गुंतवणूक आज ऑरिक सिटीत आली आहे. जवळपास 8 हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. आणि 12 ते 13 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. ही सगळी गुंतवणूक इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाड्यांमधील आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक म्हणून याकडे पाहिलं जात आहे. याकरिता संभाजीनगरची निवड होणं अत्यंत आनंदाची बाब आहे".

पुढे ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने गुंतवणुकीसाठी पाठपुरावा केला. त्यांच्यासमोर अनेक राज्यांचे पर्याय असताना आणि कर्नाटकात आधीपासून अस्तित्व असताना महाराष्ट्राची निवड केली ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. मी संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं अभिनंदन करतो. या माध्यमातून मोठी गुंतवणूक आल्याने मराठवाड्याचा विकासाला चालना मिळणार आहे".

टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करार झाला असून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते.