शेवटची संधी, नाही तर आम्ही थेट कर्नाटकात जाऊ... जतमधील कृती समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावांचा वाद पेटला, जत तालुक्यातील पाणी कृती समितीचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र सरकारला दिला इशारा

Updated: Nov 24, 2022, 09:08 PM IST
शेवटची संधी, नाही तर आम्ही थेट कर्नाटकात जाऊ... जतमधील कृती समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Sangli, Jath) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई होती. या तालुक्याला पाणी देऊन आम्ही पाणी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला असा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचयातींनी कर्नाटकात सामील होऊ इच्छितो असा ठराव केला होता, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय. 

जत तालुक्यातील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्या नंतर आता महाराष्ट्र मधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे असा आरोप करत इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी, पाणी द्या नाही तर आम्ही एन ओ सीची वाट बघणार नाही, आम्ही थेट कर्नाटकात जाऊ असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिला आहे. या बाबतउद्या शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता उमदी मध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी
2012 पासून आम्ही पाण्यासाठी आंदोलन करत आहोत, महाराष्ट्रात आम्हाला पाणी मिळत नसेल आणि कर्नाटक सरकार जर आम्हाला पाणी देत असेल, तर कर्नाटका जाण्याची आमची भूमिका आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी देत आहोत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी आणि त्यात जत तालुक्याला कमीत कमी कालावधीत पाणी पुरवठा करतो आणि विस्तारीत योजनेला निधी जाहीर करतो, अशी घोषणा करावी अशी मागणीही पाणी कृती समितीने केली आहे.

शरद पवार यांनी बेळगाव आणि कारवार महाराष्ट्रात द्या मग आम्ही चर्चा करतो असं वक्तव्य केलं होतं. म्हणजे त्यांनी जत तालुका कर्नाटकात जाणार आहे हे निश्चित धरून आम्हाला पाणी दिलेलं नाही असा आरोपही जत तालुका पाणी कृती समितीने दिला आहे. 

हे ही वाचा : शिंदे गटाचं पुन्हा 'काय झाडी, काय डोंगार....' गुवाहाटी दौऱ्यासाठी 180 सीटर विमान बूक

विरोधकांची सरकारवर टीका
विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) गंभीर आरोप केला आहे.  राज्यातलं सरकार तातडीने घालवलं नाही तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा निषेध करत अन्याय सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलीय.