जायकवाडी योजनेच्या व्हॉल्व्हला गळती, नगरपालिकेचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.

Updated: May 17, 2019, 06:05 PM IST
जायकवाडी योजनेच्या व्हॉल्व्हला गळती, नगरपालिकेचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष title=

नीतेश महाजन, झी मीडिया, जालना : जायकवाडी योजनेच्या जलवाहिनीतून आधीच पाणी चोरीला जात असताना दुसऱ्या बाजूला या योजनेच्या व्हॉल्व्हला ठिकठिकाणी गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. आज अंबड रस्त्यावरील लालवाडी फाट्यावर या योजनेच्या व्हॉल्व्हला पुन्हा गळती लागली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जालना नगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. 

सध्या जालना शहराला पाणीपुरवठा करण्यात पालिकेला सपशेल अपयश आलं आहे. शहरातील काही भागांत 20 दिवसानंतर तर काही भागात तब्बल एका महिन्यानंतर पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे जालनेकरांची तहान सध्या विकतच्या पाण्यावर अवलंबून आहे. शहरातील जुन्या अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम शहरात सुरु आहे.