Journalist Shashikant Warse Accident: रत्नागिरीमधील राजापूर (Rajapur) येथे कार अपघातात जखमी झालेले पत्रकार शशिकांत वारिसे (Journalist Shashikant Warise) यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत वारसे यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. दरम्यान या अपघातामागे (Accident) घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी (Ratnagiri Police) याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर राजापूर पोलीस स्थानकात (Rajapur Police Station) ३०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचं कात्रण वारीसे यांनी शेअर केलं होतं. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनरसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगातील गाडीने शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादम्यान त्यांचं निधन झालं.
महत्त्वाची बाब म्हणजे शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला अपघात देणारी कार पंढरीनाथ आंबेरकर यांच्या मालकीची आहे. यामुळे वारीसे यांच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. कोर्टासमोर हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
"पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून मृत्यू होतो हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे," अशी माहिती रिफायनरी विरोधक अशोक वालम यांनी दिली आहे.