यवतमाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेल्या कलावती बांदूरकर यांच्यामागे लागलेलं दुष्टचक्र सुरूच आहे. कलावती यांच्या मुलाचं एका अपघातात निधन झालंय.
कलावती यांच्या बलराम बांदूरकर या मुलानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. निकाल लागल्यानंतर महाविद्यालयातून ट्रान्सफर सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलेल्या बलरामचा परतताना दुचाकीवरून अपघात झाला. जळका गावाजवळ झालेल्या या अपघातात बलरामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कलावतीबाईंवर पुन्हा एकदा दु:खानं आघात केलाय.
कलावती बांदूरकर यांचा पती परशुराम यांनी २००५ मध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती.
२००८ साली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा आणि आठ मुलांची आई असलेल्या कलावतीबाईंना काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले होते... राहुल गांधींकडून त्यांना काही आर्थिक मदतही मिळाली होती. त्यानंतर कलावतीबाई पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या.
२००९ साली विदर्भ जनआंदोलन समितीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता. पंरतु, वैयक्तिक कारण पुढे करत त्यांनी आपला निवडणूक अर्ज मागेही घेतला होता.
२०१० साली कलावती यांचे जावई संजय कळस्कर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.
त्यानंतर पुढच्याच वर्षी, २०११ साली कलावती यांची मुलगी सविता दिवाकर खामकर हिनंदेखील कर्जबाजारीपणाला आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. चंद्रपुरातील राळेगावमध्ये ती राहत होती.