Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा (BJP) दारुण पराभव झाला असून काँग्रेसने (Congress) दक्षिणेतील एकमेव राज्य पुन्हा जिंकलं आहे. काँग्रेसने बहुतमाचा 112 चा आकडा ओलांडला असून भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा 40 हून अधिक जागांचा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील प्रमुख नेत्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपाला लक्ष्य करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियांवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
नागपूरमध्ये कर्नाटकच्या निकालांबद्दल प्रसारमाध्यमांशी फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळेस त्यांनी विरोधकांना लक्ष्य करताना, "मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असे काही दिवाने मला पहायला मिळत आहेत. ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये काही जागाही नाहीत, ज्यांचं कर्नाटकमध्ये काही अस्तित्वही नाही असेही लोक त्या ठिकाणी आज नाचताना आपल्याला पहायला मिळत आहेत. खरं म्हणजे या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की हे लोक आयुष्यभर लोकांच्या घरी पोरगा झाला म्हणूनच आनंद साजरा करतात. मग त्यांच्याबद्दल दुसरी प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटतं नाही," असा टोला आधी थेट कोणाचाही उल्लेख न करता लगावला. तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी, "कर्नाटकमध्ये जे काही झालं त्याचा परिणाम देशातही नाही आणि महाराष्ट्रातही नाही. देशात मोदीजींचं सरकार येणार आणि महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार येणार," असा विश्वासही व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय की भविष्यात आपला महाराष्ट्रात विजय होईल, असा प्रश्न फडणवीस यांना पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, "त्यांना पोटनिवडणूक झाली तरी असं वाटतं. पण असं होतं नाही. आम्ही त्यांना 2014 ला दाखवलं, 2019 मध्येही दाखवलं आणि 2024 लाही दाखवणार," असं म्हटलं.
नक्की वाचा >> भाजपाने कर्नाटकमध्ये 40 जागा गमावल्यानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?
शरद पवारांनी केलेल्या टीकेवरही फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच फडणवीसांनी उत्तर दिलं. "मोदी है तो मुमकीन है हे जनतेनं नारालेलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र आली तर..." असं म्हणत पत्रकार प्रश्न विचारत असतानाच फडणवीसांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. "अरे, पवार साहेबांनी तिथे जागा लढवल्या ना? त्यांना 1 टक्काही मतं नाहीत. 0.5 टक्क्यांच्या खाली मतं आहेत त्यांना. मी जे सांगितलं होतं, यांचा उमेदवार पॅक करुन परत पाठवा. निप्पाणीच्या लोकांनी माझं ऐकलं. त्यांनी पवार साहेबांचा उमेदवार पॅक करुन परत पाठवला. त्यांनी बोलल्यावर आपण काय महत्त्व देणार?" असा प्रतिप्रश्न फडणवीसांनी पत्रकाराला केला.
"उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की हा मोदी-शाहांचा पराभव आहे," असं म्हणत अन्य एका पत्रकाराने फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी, "त्यांचं ठरलेलं आहे की एखाद्या महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही एखाद्या वॉर्डाची निवडणूक जरी हरलो तरी त्यांना ते मोदी-शहांचंच उपयश वाटतं. ज्यांना सगळं पिवळं दिसतं त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार," असं म्हटलं. तेवढ्यात एका पत्रकाराने उद्धव ठाकरे गटाच्या बैठकीतील संदर्भ देत, कर्नाटक भाजपाच्या हातून गेलं तसा महाराष्ट्रही जाणार असं उद्धव ठाकरे नेत्यांच्या बैठकीत म्हणाले असं सांगत फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. यावर, "मी एवढंच म्हणाले की, मुंगेरीलाल के हसीन सपने कभी पूरे नहीं होंगे," असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.