नागपूर : आरजू जान. काश्मीरच्या अनंतनागमधील पाच वर्षीय चिमुरडीला जन्मापासूनच दृष्टीदोष. तिच्या गरीब आई-वडिलांना सातत्याने तिचा दृष्टीदोष कधी दूर होईल याची चिंता सतावत होती. नागपुरातील 'सक्षम' या दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेला आरजूबाबत माहिती मिळाली. 'सक्षम’संस्थेने आपुलकीच्या पुल उभारला आणि त्यांच्यावरून चालत काश्मिरातील पाच वर्षांची चिमुकली मग थेट नागपुरात पोहचली. नागपुरात तिच्या जन्मजात दृष्टीदोषावर निःशुल्क उपचार झालेत आणि तिची दृष्टी सामान्य झाली.
समदृष्टी क्षमता आणि विकास अनुसंधान मंडळ अर्थात ‘सक्षम’ ही संस्था दिव्यांगासाठी काम करते. या संस्थेच्या देशभर पसरलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून जम्मू काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातली चिमुकली आरजू जान संपर्कात आली. आरजूला जन्मापासूनच दृष्टीदोष होता. काश्मिरामध्ये तिच्यावर उपचारासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले. मात्र घरची आर्थिक परिस्थिती आणि काश्मिरातील वातावरणामुळे त्यांना आरजूचा दृष्टीदोषावर योग्य उपचार होत नव्हता.
दरम्यान काश्मिरातील दिव्यांगांसाठी काम करणारा जावेद अहमद तख हा सक्षम संस्थेच्या संपर्कात होता. ‘सक्षम’ संस्थेला जावेद अहमद यांच्याकडून जन्मजात दृष्टीदोष असलेल्या आरजू जान या चिमुकलीबाबत माहिती मिळाली. पेशाने ड्रायव्हर असलेले जान मोहम्मद आणि त्यांची पत्नी नसिमा अख्तर यांना आपल्या मुलीच्या दृष्टीदोषाची चिंता सतावत होती. परंतु, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या डोळ्यांवर महागडे उपचार करण्याची त्यांची क्षमता नव्हती. अशा वेळी ‘सक्षम’ संस्थेने त्यांना मदतीचा हाथ दिला.
नागपुरातील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुवर्णा बालंखे यांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यांनी केलेल्या निदानानुसार इन्फंटाईल इजोट्रोपिया सिंड्रोम नामक मस्युलर डिसीसमुळे आरजूच्या डोळ्यांना जन्मजात तिरळेपणा आला होता. त्यामुळे तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिची दृष्टी सामान्य झाली आहे. त्यामुळे आरजूच्या डोळ्यातील भाबडेपणा आणि निरागसता पाहून तिच्या कुटुंबियांचे चेहरे आनंदाने उजळलेत. मुलीवर झालेल्या निःशुल्क उपचारांमुळे तसेच आरजूवर झालेल्या उत्तम उपचारामुळे जान मोहम्मद आणि त्यांच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ती खूप खूशीत आहेत.
आयुष्यात पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या जान मोहम्मद नागपूर आणि ‘सक्षम’ संस्थेला आयुष्यात कधीच विसरू शकणार नसल्याचे जान मोहम्मद सांगतात. नागपुरात मिळालेला स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकीची माहिती खोऱ्यातील घराघरात जाऊन सांगू, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.