शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : शेतीच्या वादातून दोन बीएसएफ जवानांनी स्वत:च्या ७५ वर्षीय चुलत्याला बेदम मारहाण करत चाकूने वार केले आहेत. ही घटना लातूर येथील औसा तालुक्यातील फत्तेपूर येथे घडली आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या दोन जवानांनी हे कृत्य केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रविण सुरेश माळी आणि सचिन सुरेश माळी असे त्या दोन बीएसएफ जवानांची नावे आहेत. हे दोघे सुट्टीसाठी गावात आल्यानंतर हे कृत्य केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात या दोन्ही बीएसएफ जवनांसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हे जवान फरार असल्याचे समोर येत आहे. फत्तेपूर गावात सदाशीव माळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी घेवून जात होते. त्याचवेळी दोन जवानांनी शेतजमिनीचे जुने भांडण काढून त्यांना मारहाण केली.
वृद्ध चुलत्याला मारहाण करत, त्यांना नग्न अवस्थेतच सोडून त्यांनी पलायन केले. त्यानंतर वडील अद्याप घरी परतले नसल्याने सदाशीव माळी यांच्या मुलाने त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते शेतात बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर सदाशीव माळी यांना औसा येथील पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर पोलिसांनी मेडिकलसाठी औसा येथील सरकारी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनीही बीएसएफ मध्ये कार्यरत असलेले दोन जवानासह पाच जणांविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बीएसएफ जवानांच्या या कृत्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.