कोल्हापुरात अडीच वर्षाच्या मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या... समोर आलं धक्कादायक कारण

kolhapur Crime : अडीच वर्षांच्या मुलीसोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीने पोलीस तपासात हत्येचे कारण देखील सांगितले आहे

आकाश नेटके | Updated: May 20, 2023, 02:32 PM IST
कोल्हापुरात अडीच वर्षाच्या मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या... समोर आलं धक्कादायक कारण title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : किरकोळ वादातून अडीच वर्षाच्या बालिकेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (kolhapur crime) उघडकीस आली आहे. आरोपीने अडीच वर्षाच्या मुलीला पाण्यात बुडवून ठार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Kolhapur Police) सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे परराज्यातून आलेल्या आरोपीचे मुलीच्या वडिलांसोबत वाद झाला होता. त्याच रागातून मुलीचे अपहरण करत आरोपीने मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे.

कार्तिकी घटे अस अडीच वर्ष बालीकेचे नाव आहे. फिरस्ता असलेल्या राजू बिहारी नावाच्या आरोपीने भवानी मंडप मधून कार्तिकीचे अपहरण केले होते. त्यानंतर तिला रंकाळा परिसरात आणून पाण्याच्या टाकीत बुडवून मारले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी राजू बिहारीला अटक केली आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"18 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास तक्रारदार गणेश भाऊसाहेब घटे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळांसह भवानी मंडप परिसरात थांबले होते. दुपारच्या वेळी झोप लागलेली असताना त्यांची अडीच वर्षांची मुलगी भवानी मंडप परिसरातून गायब झाल्याची तक्रार गणेश घटे यांनी नोंदवली. बऱ्याच वेळ तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी ताबडतोब त्यांच्यासोबत जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही तपासले असता एक माणूस त्या मुलीला कडेवर बसवून घेऊन जात असल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना तपास करत असताना त्या व्यक्तीचे नाव राजू बिहारी असल्याचे कळाले. यानंतर गणेश घाटे यांनी देखील ही व्यक्ती भवानी मंडपात झोपायला असते असे सांगितले. त्यानंतर आरोपीविरुद्ध मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासामध्ये रंकाळा तलावाच्या परिसरामध्ये राजू बिहारी ही व्यक्ती सापडली. चौकशी केली असता त्याने आपले गणेश घटे यांच्यासोबत पैशावरुन वाद होता असे सांगितले. त्याच कारणावरुन गणेश घटेची मुलगी कार्तिकीला पळवून नेले आणि तिला पाण्याचा हौदामध्ये बुडवून मारले, अशी कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ रंकाळा परिसरातील शेतातमध्ये असणाऱ्या पंप हाऊससारख्या घरात जाऊन तपासणी केली असता मुलीचे शव तरंगताना आढळून आले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणामध्ये भादवि कलम 364 आणि 303 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे कृत्य करण्यामागे आरोपीचे नक्की कारण होते याचा तपास पोलीस करत आहेत," अशी माहिती पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी दिली.

कशासाठी झाली हत्या?

गणेश घटे हे त्यांची पत्नी आणि मुलांसह वीटभट्टीच्या कामासाठी करवीर तालुक्यातील बालिंगा पाडळी येथे आले होते. वीटभट्टीचे काम संपल्याने ते बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भवानी मंडपात आले होते. मंडपात झोपलेले असताना तिथेच खेळत असलेली कार्तिकी अचानक गायब झाली. यानंतर घटे यांनी पोलिसांत तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजू बिहारी तिला घेत जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा दोन दिवसांपूर्वी गणेश घटेसोबत वाद झाल्याचे समोर आले. वीटभट्टीवर केलेल्या कामाचा मोबदला गणेशमुळे मिळाला नाही, याचा राग राजूच्या मनात होता. याच रागातून त्याने कार्तिकीची हत्या केली.