कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची रात्रीच धोक्याच्या पातळीकडे वाटचालीची शक्यता

कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे.

Updated: Aug 5, 2020, 08:35 PM IST
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची रात्रीच धोक्याच्या पातळीकडे वाटचालीची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३७ फूट ९ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट एवढी आहे, तर धोका पातळी ४३ फूट आहे. आज राात्री पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहून, सुरक्षित स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील लोकांचं स्थलांतर सुरू झालं आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनानंतर ग्रामस्थांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. चिखली गावातील ग्रामस्थांनी प्रत्यक्षात स्थलांतराला सुरुवात केली आहे. दौलत देसाई यांनी चिखली गावात पोहोचून ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची विनंती केली. 

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये दवंडी पिटून नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. 

दरम्यान कोल्हापूरच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना फोन करून कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच अतिरिक्त मदत लागल्यास तात्काळ संपर्क करायलाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.