कोल्हापूर : करवीर निवासनी अंबाबाई (Karveer Niwasani Ambabai), राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि पन्हाळा गडाबाबत kolhapur.gov.in या सरकारी वेबसाईटवर चुकीचा इतिहास देण्यात आला होता. ही बातमी झी मीडियाने दाखविल्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आक्षेपार्ह मजकूर तात्काळ हटवू अस आश्वासन दिलं होतं.. त्यानंतर प्रशासनाने हा आक्षेपार्ह आणि चुकीचा इतिहास सांगणारा मजकूर सरकारी वेबसाईटवरन अखेर हटविला आहे.
दरम्यान, चुकीची माहिती सरकारी वेबसाइटवर प्रसिद्ध केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी संताप वक्त केला होता. सर्व ऐतिहासिक संदर्भासह संभाजीराजे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वेबसाईटवरील चुकीची माहिती तात्काळ काढून टाकावी, अशी मागणी केली होती. या पत्रामध्ये संभाजीराजे यांनी शाहू महाराजांच्या इतिहासाला उजाळा देत असतानाच प्रशासनाला नेमका इतिहास काय आहे, याचा उल्लेख पत्रात करत प्रशासनाला टोला लगावला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चुकीचा मजकूर काढला जाईल, असे आश्वासन दिले होते.
अंबाबाईच्या मूर्तीमध्ये हीरक नावाचा धातू मिसळला आहे. ज्यामुळे प्राचीन काळापासून मूर्तीवर प्रकाश फेकला जातो, असा जावई शोध कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या वेबसाईटवर लावण्यात आला होता. इतकच नाहीतर इतिहासाची मोडतोड करत जुना राजवाडामध्ये राजश्री शाहू महाराजांचे थडगे असल्याचा उल्लेख देखील आढळून आला होता. त्यामुळे kolhapur.gov.in या वेबसाईटवर धादांत खोटी माहिती कोणी टाकली असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला होता.
खोटा इतिहास कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या वेबसाईटवर टाकण्यात आला होता. ज्यामुळे कोल्हापूरला येण्यापूर्वी कोल्हापूरचा इतिहास वाचणार्या पर्यटकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचत आहे. त्यामुळे इतिहास अभ्यासक चुकीची माहिती टाकणाऱ्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. खरंतर शासनाच्या एखाद्या वेबसाईटवर माहिती टाकण्याआधी त्या माहितीची इतिहास अभ्यासक किंवा मंदिर, मूर्ति अभ्यासक यांच्याकडून या माहितीची तपासणी करून घेण्याची गरज आहे. अस असताना चुकीचे संदर्भ, गचाळ भाषा याचा वापर करत इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न शासनाच्या वेबसाईट वरच करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात होता.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही नाराजी व्यक्त केली होती. खरे तर इतिहास हा इतिहासच असतो त्यामध्ये नवसंशोधन पुढे येऊ शकत. पण कोणताही आधार नसताना त्या इतिहासाचं चुकीच्या पद्धतीने मांडणी करून दिशाभूल केला जाणारा मजकूर शासनाच्या वेबसाईट येतोच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तात्काळ खोटा इतिहास तात्काळ हाटवावा आणि त्याचबरोबर इतिहासाची पाने चाळून खरा इतिहास वेबसाईटवर टाकण्याची तसदी घ्यावी इतकीच माफक अपेक्षा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती.