पिंपरीत कोयता गँगचा धिंगाणा! पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून मेडिकलची तोडफोड

Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) कोयता गँगची दादागिरी अद्यापही सुरु आहे. पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून टोळक्याने मेडिकलची तोडफोड केली असून सीसीटीव्हीत घटना कैद झाली आहे.    

शिवराज यादव | Updated: Apr 30, 2023, 08:48 AM IST
पिंपरीत कोयता गँगचा धिंगाणा! पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून मेडिकलची तोडफोड title=

Crime News: पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. याचं कारण म्हणजे कोयता गँगवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतानाही त्यांना यश येताना दिसत नाही आहे. नुकतंच पिंपरीत पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून टोळक्याने मेडिकलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. 

पिंपरीत काही तरुण पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी आले होते. पण पैसे न देताच ते निघून चालले होते. यावेळी मेडिकल चालकाने पैसे मागितले असता ते संतापले. यानंतर हातात कोयता घेऊन टोळक्याने मेडिकलची तोडफोड केली. यात मेडिकलमध्ये काम करणारा कामगार जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

या घटनेनंतर मेडिकल चालकाने पिंपरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र शहरांमध्ये सातत्याने होत असलेल्या या छोट्या मोठ्या टोळीच्या दादागिरीच्या घटना पाहता पोलिसांचा त्यांच्यावर वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

कोयता खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य

गेल्या काही काळापासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत माजवली आहे. पुणे पोलिसांनी वारंवार प्रयत्न करुनही कोयता गँगची दहशत मात्र कमी होताना दिसत नाही. कोयता गँगला आळा घालण्यासाठी पोलिसांनी युक्ती आखली होती. त्यानुसार शहरात कोयता खरेदी करणाऱ्यांना आधारकार्ड दाखवावं लागणार आहे. मात्र यानंतरही कोयता गँगवर वचक बसलेला दिसत नाही.