मुंबईः मुंबई महानगर पालिका आणि MMRDA मुंबई शहर आणि उपनगरात उड्डाणपुलांचे जाळे तयार करत आहे. यामुळं मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदरपर्यंत लिंक रोड बनवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. एलएंडटी कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. दहिसर ते भाईंदरपर्यंत 5.3 किमी लांबीचा लिंक रोड बनवण्यात येणार आहे. लिंक रोडच्या बांधकामाचा खर्च 1,981 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या लिंक रोडमुळं दहिसर ते भाईंदरचे अंतर अवघ्या 10 मिनिटांवर येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंक रोड प्रकल्पासाठी 25 जुलैरोजी निविदा मंजुर करण्यात आल्या होत्या. तीन कंपन्यांना जे. कुमार, एल एंड टी, एफकॉन्स या तीन कंपन्यांनी टेंडर भरले होते. एल अँड टी व्यतिरिक्त दोन्ही कंपन्यांनी मंजुर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची निविदा भरली होती. तर, एल अँड टी कंपनीने मंजुर केलेल्या टेंडर व्यतिरिक्त -0.86% निविदा भरली होती. त्यामुळं या कंपनीकडे दहिसर-भाईंदर लिंक रोड बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. वर्क ऑर्डर जारी केल्यानंतर 42 महिन्यामध्ये कंपनीला हा प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहिल.
दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) यांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उन्नत रस्ते प्रकल्पात (४५ मीटर रुंद) आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. या प्रकल्पासाठी एल ऍण्ड टी कंपनीने सर्वात कमी किंमतीची बोली लावली आहे.
मुंबई किनारी रस्त्याचा अंतिम टप्पा असलेला हा उन्नत मार्ग… pic.twitter.com/tB7R9WDpRI
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2023
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. या प्रकल्पांतर्गंत दहिसर खाडीमध्ये जवळपास 100 मीटर लांब स्टीलचा पुल उभारला जाईल. एकूण 5.3 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोडसाठी एकूण 330 खांब उभे करण्यात येतील. दररोज 75 हजार गाड्या या पुलाचा प्रतिदिन वापर करतील, अशी शक्यता बीएमसीने वर्तवली आहे. इतकंच नव्हे तर, यात आधुनिक ७ मजल्यांची पार्किंग सुविधा उभारण्यात येईल. ज्यामध्ये 550 गाड्या पार्क करता येणार आहेत. त्याचबरोबर बस टर्मिनल आणि ट्रान्सपोर्ट हबदेखील असेल. जे थेट मेट्रोला कनेक्ट होईल.
दहिसर लिंक रोडच्या दोन्ही बाजूला 4 लेन असतील दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनांचा भार 35 टक्के कमी होईल, असा विश्वास बीएमसीने वर्तवला आहे. बीएमसी बांधत असलेल्या हा लिंक रोड कांदरपाडा मेट्रो स्टेशन लिंक रोड दहिसर (प) पासून ते सुभाषचंद्र बोस ग्राउंट भाईंदर (पश्चिम) पर्यंत आहे. या पूलामुळं प्रवाशांचे अंतर अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. सध्या या प्रवासासाठी ३० मिनिटांचा वेळ लागतो मात्र, या पुलामुळं प्रवाशांच्या वेळीची बचत होणार आहे. तसंच, यामुळं मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोंडी कमी होण्यास मदत होईल.