Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये स्थान आहे. त्यांचे कार्यकर्ते तर त्यांच्याकडे राज्याच्या भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात. एमबीए केलेल्या पंकजा लग्न झाल्यानंतर कुटुंबात व्यस्त होत्या. त्यानंतर मुलगा झाल्यानंतर त्या राजकारणात पुन्हा परतल्या. वडिलांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीय प्रवास तसा सोपा राहिलेला नाही. दरम्यान वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
पंकजा मुंडे या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. त्यांचं बालपण सर्वसामान्यांप्रमाणेच होतं. पंकजा मुंडे सहावीत शिकत असताना आपल्या मैत्रिणींसह रिक्षातून शाळेत जात असत. नंतर त्यांनी वडिलांकडे हट्ट करत सायकल घेतली होती.
पंकजा मुंडे या भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. जेव्हा पंकजा यांचा जन्म होणार होता तेव्हा प्रमोद महाजन यांनी आधीच नाव ठरवलं होतं. जर मुलगा झाला तर त्याचं नाव कमल आणि मुलगी झाली तर तिचं नाव पंकजा ठेवलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. 26 जुलै 1971 रोजी परळीत डॉक्टर लोहिया हॉस्पिटलमध्ये मुंडे कुटुंबात मुलीचा जन्म झाला आणि तिचं नाव पंकजा ठेवण्यात आलं.
पंकजा मुंडे यांचा जन्म झाल्यानंतर दोन वर्षांनी गोपीनाथ मुंडे रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. गोपीनाथ मुंडे आमदार असतानाही त्यांची मुलं साधं आयुष्य जगत होती. सहावीत असेपर्यंत पंकजा मुंडे मैत्रिणींसह रिक्षातून शाळेत ये-जा करत असत. यानंतर त्यांनी वडिलांकडे हट्ट करुन सायकल खरेदी केली होती.
पंकजा मुंडे यांनी परळीत रेल्वे स्टेशनजवळ कामगारांच्या मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या बालवाडीतून शिक्षणाला सुरुवात केली होती. दहावीनंतर त्यांना औरंगाबादला पाठवण्यात आलं होतं. तिथे दोन महिने हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर त्या परत आल्या होत्या. असं सांगितलं जातं की, कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर जेव्हा गोपीनाथ मुंडे त्यांना हॉस्टेलमध्ये भेटण्यास पोहोचले होते, तेव्हा पंकजा मुंडे परत येण्यासाठी त्यांच्या गाडीत येऊन बसल्या होत्या.
यानंतर परळीच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये त्यांचं अॅडमिशन करण्यात आलं. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब मुंबईत शिफ्ट झालं. यानंतर पंकजा मुंडे यांनी जयहिद कॉलेजात प्रवेश घेतला. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा मुंडे यांना डॉक्टर बनवायचं होतं. पण पंकजा मुंडे यांनी बंगळुरुत जाऊन एमबीए केलं.
पंकजा मुंडे यांना यशश्री आणि प्रीतम मुंडे या दोन बहिणी आहेत. पंकजा यांची दुसरी बहीण यशश्री या वकील आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी 6.96 लाख मतांनी विजय मिळवून इतिहास घडवला.
पंकजा मुंडे यांनी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. 2001 मद्ये पहिल्यांदा त्या परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
दरम्यान, वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन असं आवाहन केलं आहे.