सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मूर्ती लहान पण किर्ती या म्हणीला साजेशी अशी धडाकेबाज कामगिरी एका 13 वर्षाच्या मुलीने केली आहे. भावाचा जीव वाचवण्यासाठी विजेच्या तारांचीही पर्वा केली नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून या मुलीने आपल्या चार वर्षाच्या भावाचा जीव वाचवला आहे. या मुलीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. लक्ष्मी येडलेवार (Lakshmi Yedlewar) असे या मुलीचे नाव आहे. तिच्यावर सद्या कौतुकाचा वर्षाव होत आहे (Bal shaurya purskar 2023).
लक्ष्मीने विद्युत प्रवाह असलेल्या तारेला चिकटलेल्या लहान भावाला स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले आहे. 13 वर्षीय लक्ष्मीला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. लक्ष्मी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडी सावळी येथील राहणारी आहे.
21 सप्टेंबर 2021 रोजी लक्ष्मी आपल्या घरात अभ्यास करत होती. तिचे आई वडील रोजमजुरीसाठी कामावर गेले होते. तिचा 4 वर्षाचा भाऊ आदित्य घरामागे खेळत होता. बाजूच्या घराच्या पत्रावरून एक लोखंडी तार बांधलेली होती. त्या तारेत विद्युत प्रवाह उतरला होता. अचानक आदित्यचा तारेला स्पर्श झाला. आदित्यचा ओरडण्याचा आवाज एकून लक्ष्मी धावत गेली. तारेला चिकटलेल्या आदित्यला पाहून तिने तात्काळ त्याचे शर्ट जोरात ओढून त्याला बाजूला फेकले.
पण, यात लक्ष्मीचा तारेला स्पर्श झाला आणि ती बेशुद्ध पडली. ग्रामस्थानी तात्काळ दोघांना रुग्णालयात हलवले. उपचारानंतर दोघांची प्रकृती सुधारली. लक्ष्मीने लक्ष्मीने दाखवलेल्या धैर्यामुळे तिच्या भावाचे प्राण वाचले. तिच्या या शौर्या साठी तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालाय. 26 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.