इन्स्टाग्रावर शेवटचा व्हिडीओ करत उचललं धक्कादायक पाऊल

भांडणातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला, नेमकं काय घडलं वाचा 

Updated: Jun 13, 2021, 10:35 AM IST
इन्स्टाग्रावर शेवटचा व्हिडीओ करत उचललं धक्कादायक पाऊल

लातूर: फेसबुकवर व्हिडीओ करून एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना नुकतीच ताजी असताना असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात घडला आहे. इन्स्टाग्रामवर आत्महत्येचा व्हिडीओ करून 19 वर्षांच्या युवतीनं टोकाचं पाऊल उचललं. या तरुणीनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील आनंद नगर भागात राहणाऱ्या सोनी शेख या 19 वर्षांच्या युवतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी इंस्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ अपलोड केला होता. या घटनेमुळे शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. 

इंस्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये सोनी शेख ही रडत असून ती मानसिक तणावात दिसत आहे. आपण हे जग सोडून जात असून आपल्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसल्याचे तिनं म्हटलं आहे. सोनी शेख ही लातूर शहरातील आनंद नगर भागात आपल्या आईसोबत राहत असे. आत्महत्येच्यावेळी ती घरात एकटीच होती. 

आत्महत्येनंतर घरमालकाने फोन करून सोनीने आत्महत्या केल्याचे सांगितलं. सोनी काही दिवसांपासून एका व्यक्तीला फोनवर बोलून भांडत होती. तसेच फोनमध्ये त्या व्यक्तीचे फोटो असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी मयत सोनी शेख हिच्या आईने केली आहे. याप्रकरणी विवेकानंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.