Mumbai News : मुंबईत आतापासूनच उन्हाळ्याची सुरुवात? उष्मा वाढणार आणि... 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Mumbai News : नव्या वर्षाची सुरुवात होताच या वर्षात वातावरण नेमकं कसं असेल यासंदर्भात हवामान विभागानं दिलीये महत्त्वाची माहिती...   

सायली पाटील | Updated: Jan 1, 2025, 12:44 PM IST
Mumbai News : मुंबईत आतापासूनच उन्हाळ्याची सुरुवात? उष्मा वाढणार आणि... 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको  title=
Mumbai weather updates get ready for Brace for higher temperatures and sweltering days in 2025

Mumbai News : 2025 या वर्षाची सुरुवात झाली असून, संपूर्ण जगानं नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत केलं आहे. मुंबईकरांचाही उत्साह यावेळी पाहण्याजोगा होता. गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडी अनुभवणाऱ्या या शहरासाठी येते काही दिवस मात्र अडचणीचे असणार आहेत. कारण आहे ते म्हणजे शहरात होणारी तापमानवाढ. 

हवामान विभागानं पुढील काही दिवसांच्या धर्तीवर महत्त्वाचा इशारा देत शहरात येत्या काही दिवसात तापमानात लक्षणीय वाढ होणार असून उष्मा आणखी दाहक होणार असल्याचा इशारा दिला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं दिवसाचं तापमान वाढणार असून, शहरातील किनारपट्टी भागांमध्ये तापमानवाढ नोंदवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सोमवारी शहरात दुपारच्या वेळी सरासरी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं फक्त मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमानवाढीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांतच पश्चिमी झंझावाताचा परिणाम नाहीसा झाला तरीही पूर्वेकडून येणारे वारे मात्र मुंबईतील तापमानावर परिणाम करणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : गेला गारठा कुणीकडे? नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीची प्रतीक्षा 

नव्या वर्षातील पहिल्या आठवड्यामध्ये शहरातील दिवसाचं तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून, सकाळ आणि दुपारच्या वेळी दाहकता तीव्र असणार आहे. रात्रीच्या वेळी मात्र तापमान 20 अंशांच्या घरात राहील असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं नव्या वर्षात मुंबईकरांना उन्हाळा काहीसा आधीपासूनच सोसावा लागणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.